0

मुंबई : मुख्य अभ्यासक्रमात चित्रकला, संगीत यासारख्या अभ्यासक्रमबाह्य असलेल्या विषयांना समाविष्ट करता येईल का याबाबत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे शिक्षण तज्ज्ञांशी चर्चा करणार असल्याचे बोरीवली येथील वीर सावरकर उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या दरम्यान त्यांनी सांगितले.
या चित्रकला स्पर्धेचे आयोजन युथ कल्चर असोसिएशनतर्फे ‘सृजन-शोध मनातील चित्रांचा २०१५’ करण्यात आले होते. सात गटांत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांबरोबरच वृद्ध आणि अपंगांनीही सहभाग घेतला होता. पाच हजारांहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
शालेय शिक्षणमंत्र्यांनी या ठिकाणी भेट देऊन मुलांच्या कलेचे कौतुक केले.चित्रकला हे माध्यम मुलांना व्यक्त होण्यासाठीचे प्रभावी माध्यम आहे. त्यांच्या मनातील भावना ते चित्रकलेच्या माध्यमातून कागदावर उतरवत असतात, अशा स्पर्धांच्या माध्यमातून त्यांना त्या भावना व्यक्त करण्यासाठी संधी मिळत असते, असे सांगत त्यांनी ही स्पर्धा आयोजित करणा-या आयोजकांचे कौतुक केले. त्याचबरोबर सध्या अभ्यासक्रमाबाहेर असणारे हे विषय मूळ अभ्यासक्रमात यायला हवेत.
यासाठी आपण शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा नारा विद्याथ्र्यांपर्यंतही पोहचला आहे, याची प्रचिती मला येथे पहायला मिळाली. एका स्पर्धकाने एका बाजूला गांधीजींची काठी आणि दुस-या बाजूला नरेंद्र मोदींचा झाडू काढून ‘गांधी-मोदी की पहचान स्वच्छ भारत अभियान’ असा संदेश आपल्या चित्राद्वारे दिला होता. मला या मुलांच्या सृजनशीलतेचे कौतुक वाटते, अशा शब्दांत त्यांनी मुलांच्या कलेचे कौतुक केले.

Post a Comment

 
Top